211 views
वडगाव मावळ दि.20 (प्रतिनिधी) नवी दिल्ली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्लोबल इन्स्टिट्यूट या केंद्र शासनाच्या संस्थेकडून मावळ तालुक्यातील बेबड ओहळ गावच्या विद्यमान सरपंच तेजल राकेश घारे यांना राष्ट्रीय उत्कृष्ट सरपंच पुरस्कार केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
बेबड ओहळ गावात शासनाच्या माध्यमातून अनेक लोकोपयोगी कामे सरपंच घारे यांच्या कार्यकाळात मार्गी लागली असून काही प्रगतीपथावर आहेत. सरपंच तेजल घारे यांनी महिला सक्षमीकरण व सबलीकरण उद्देश ठेवून महिलांसाठी व्यवसाय प्रशिक्षण शिबिर, महिलांसाठी आरोग्य शिबिर तसेच कोरोना काळात उल्लेखनीय कार्य केले आहे. गावात मोठ्याप्रमाणावर विकासकामे करण्यासाठी सरपंच तेजल घारे यांनी मोठे योगदान दिल्याने त्यांच्या कार्याची दखल डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्लोबल इन्स्टिट्यूटने घेऊन त्यांना राष्ट्रीय उत्कृष्ट सरपंच पुरस्कार जाहीर केला.
केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले, केंद्रीय मंत्री विजय राज, मराठी अभिनेत्री दीपाली सय्यद, वाईचे खासदार नितीन पाटील यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.
पुरस्कार मिळाल्यानंतर आमदार सुनील शेळके यांनी सरपंच तेजल घारे यांचे अभिनंदन केले. तसेच मावळ तालुक्यातील सरपंच परिषदेच्या सर्व सरपंच व बेबड ओहळ ग्रामस्थांनी घारे यांचे अभिनंदन केले आहे.