343 views
वडगाव मावळ दि.26 (प्रतिनिधी) मावळ न्यायालयात एका खटल्यात साक्षीदार दारू पिऊन साक्ष देण्यासाठी आला. हा प्रकार उघडकीस आल्याने वडगाव मावळ पोलिसांनी संबंधित मद्यपी साक्षीदारावर गुन्हा दाखल केला आहे.
आशुतोष भरत टपाले (वय 38, रा. मिलिंदनगर, वडगाव मावळ) असे गुन्हा दाखल झालेल्या मद्यपी साक्षीदाराचे नाव आहे.
पोलीस अंमलदार गणेश होळकर यांनी वडगाव मावळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वडगाव मावळ येथील सत्र न्यायालयातील न्या. अनभुले यांच्या कोर्टात एक खटला सुरू आहे. त्यामध्ये अशुतोष टपाले याची साक्ष नोंदविण्यात येणार होती. अशुतोष टपाले याला सोमवारी दुपारी 12 वाजताच्या सुमारास साक्ष देण्यासाठी न्यायालयात बोलविण्यात आले. मात्र अशुतोष हा चक्क मद्यपान करून गडबड, गोंधळ व मोठमोठ्याने आरडाओरडा करत न्यायालय परिसरात आला.
पोलिसांनी त्याला तात्काळ ताब्यात घेतले. त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यामध्ये त्याने मद्यपान केल्याचे निष्पन्न झाले. याबाबत त्याच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. वडगाव मावळ पोलीस तपास करीत आहेत.