151 views
वडगाव मावळ दि.18 (प्रतिनिधी) येथील स्व. पै.केशवराव ढोरे प्रतिष्ठान आयोजित सामुदायिक विवाह सोहळा रविवार दि.20 एप्रिल रोजी संपन्न होणार असून या विवाह सोहळ्यात 18 जोडपी विवाहबद्ध होणार असल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंढरीनाथ ढोरे व सामुदायिक विवाह सोहळा समिती अध्यक्ष अजय धडवले, कार्याध्यक्ष प्रवीण कुडे, कार्यक्रम प्रमुख संजय दंडेल यांनी दिली.
ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज मंदिर प्रांगणात रविवारी पहाटे श्रींच्या अभिषेकाने या सोहळ्याचा शुभारंभ होणार आहे. सकाळी ११ वाजता साखरपुडा, दुपारी १२ ते ३ पर्यंत भोजन समारंभ, दुपारी १.३० वाजता हळदी समारंभ, दुपारी ३ ते ५ नवरदेवाची भव्य मिरवणूक व सायंकाळी ५.३० वाजता लग्न सोहळा संपन्न होणार आहे. दरम्यान या सोहळ्यानिमित्त सकाळी ९ ते १ पर्यंत रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
आमदार सुनील शेळके यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणाऱ्या या सोहळ्यास वधूवरांना शुभाशीर्वाद देण्यासाठी हभप नितीन महाराज काकडे, मंगल महाराज जगताप, तुषार महाराज दळवी, दत्तात्रय महाराज टेमगिरे, सुदाम महाराज सानप, बाळासाहेब काशीद उपस्थित राहणार असून यावेळी माजी राज्यमंत्री मदन बाफना, संजय (बाळा) भेगडे, खासदार श्रीरंग बारणे, बापूसाहेब भेगडे, माऊली दाभाडे, विठ्ठलराव शिंदे, गणेश खांडगे आदी उपस्थित राहणार आहेत. लग्न समारंभ पूर्वी होणारी नवरदेवाची मिरवणूक या सोहळ्याचे खास आकर्षण असणार आहे.
याप्रसंगी उपस्थित राहणाऱ्या हजारो वऱ्हाडी मंडळींना बसण्यासाठी भव्य मंडप तसेच भोजन व्यवस्था करण्यात आली आहे. सोहळ्यात सहभागी होणाऱ्या जोडप्यांना संपूर्ण पोशाख, संसारपयोगी भांडी, वधूला चांदीचे अलंकार, मनगटी घड्याळ देण्यात येणार आहे. सामुदायिक विवाह सोहळा समितीचे पदाधिकारी खंडूजी काकडे, विनायक लवंगारे, अक्षय बेल्हेकर, भूषण ढोरे यांच्यासह प्रतिष्ठानचे पदाधिकारी नियोजन करत आहेत.