622 views
तळेगाव दाभाडे दि.10 (प्रतिनिधी) मावळ विधानसभा मतदारसंघातील अजित पवार गटाच्या माजी उपसरपंचाकडून 36 लाख, 90 हजार 500 रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याच्या भरारी पथकाने माजी उपसरपंचाच्या कार्यालयावर छापा टाकून रविवारी (दि.10) रोकड जप्त केली आहे
सध्या निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने विधानसभा मतदारसंघांमध्ये विविध ठिकाणी पथकांकडून तपासणी केली जात आहे.
सचिन शाबू मुऱ्हे (रा. सोमाटणे, चौराईनगर ता.मावळ) असे रोकड जप्त केलेल्या माजी उपसरपंचाचे नाव आहे.
तर सचिन मुऱ्हे यांची पत्नी धनश्री सचिन मुऱ्हे माजी ग्रामपंचायत सदस्य आहेत. तसेच आमदार सुनील शेळके यांच्या पत्नीने सुरू केलेल्या कुलस्वामिनी महिला बचत गटाच्या त्या सदस्या आहेत.
पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार मुऱ्हे यांचा जमीन खरेदी-विक्री व स्टीलचा व्यवसाय आहे. त्यांच्या पत्नी तीन वर्षापूर्वी ग्रामपंचायत सदस्या होत्या. तळेगाव दाभाडे पोलिसांना सोमाटणे येथे मुऱ्हे यांच्या कार्यालयात मोठी रोकड असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार, तळेगाव पोलीस व भरारी पथकामार्फत मुऱ्हे यांच्या कार्यालयावर छापा टाकण्यात आला. या कारवाईत कार्यालयात 36 लाख 90 हजार 500 रूपयांची रोकड आढळून आली.
मुऱ्हे यांना रकमेबाबत समाधानकारक उत्तर देता न आल्याने रोकड जप्त करण्यात आली. याबाबत निवडणूक विभाग व आयकर विभागाला कळविण्यात आले आहे. जप्त केलेली रक्कम आयकर विभागाकडे हस्तांतरित केली आहे, अशी माहिती उपायुक्त विशाल गायकवाड यांनी दिली.