232 views
वडगाव मावळ, दि.15 (प्रतिनिधी) मावळ तालुक्यातील श्रद्धास्थान असलेल्या 5 तीर्थक्षेत्रांना ‘क’ वर्ग तीर्थस्थळांचा दर्जा देण्यात आला असून या पाचही मंदिर परिसरात विविध विकास कामांसाठी ५ कोटी रुपये मंजूर झाल्याची माहिती आमदार सुनिल शेळके यांनी दिली.
*श्री कोंडेश्वर देवस्थान, श्री फिरंगाई माता मंदिर, श्री चौराई माता मंदिर, श्री संगमेश्वर देवस्थान, श्री वाघजाई माता मंदिर यांना विशेष दर्जा*
यामध्ये श्री कोंडेश्वर देवस्थान जांभवली, श्री फिरंगाई माता मंदिर नाणोली तर्फे चाकण, श्री चौराई माता मंदिर सोमाटणे, श्री संगमेश्वर देवस्थान वाडीवळे, श्री वाघजाई माता मंदिर खंडाळा या श्रद्धास्थानांचा समावेश करण्यात आला आहे.
“लवकरच या कामांना सुरुवात करणार असून तालुक्यातील या पाच मंदिरांना 'क' वर्ग तीर्थक्षेत्र स्थळाचा दर्जा तसेच विकास कामांसाठी पालकमंत्री अजित पवार यांनी मंजुरी दिल्याने त्यांचे मावळ तालुक्यातील जनतेच्या वतीने मी आभार मानतो,” असे आमदार सुनिल शेळके म्हणाले.
श्री कोंडेश्वर मंदिर परिसरात सार्वजनिक शौचालय बांधणे ४० लक्ष, वाहनतळ २० लक्ष, पाणी पुरवठा योजना करणे २० लक्ष, जांभवली ते कोंडेश्वर मंदिराकडे जाणारा रस्ता कॉन्क्रिटीकरण करणे ५० लक्ष, वाडीवळे येथील श्री संगमेश्वर मंदिर परिसरात भक्त निवास बांधणे २० लक्ष, सार्वजनिक शौचालय २० लक्ष, निवारा शेड २५ लक्ष, बाकडे बसविणे २ लक्ष, मंदिर परिसरातील रस्ते कॉंक्रिटीकरण करणे ३० लक्ष, बंदिस्त गटार व्यवस्था करणे १० लक्ष, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे १० लक्ष, सुधारणा व सुशोभीकरण करणे २० लक्ष.
सोमाटणे येथील श्री चौराई मंदिराकडे जाणारा रस्ता करणे २० लक्ष, पाणी पुरवठा व्यवस्था १२ लक्ष, सौर उर्जा विद्युत यंत्रणा बसविणे ३ लक्ष, नाणोली तर्फे चाकण येथील श्री फिरंगाई देवी मंदिराकडे सार्वजनिक शौचालय युनिट बांधणे २० लक्ष, मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याचे काँक्रिटीकरण करणे १ कोटी, वाहनतळ बांधणे २० लक्ष, सुशोभीकरण २० लक्ष, सभामंडप ३० लक्ष, विद्युत यंत्रणा बसविणे १० लक्ष असे एकूण ५ कोटी रुपये २ लाख रुपये मंजूर झाले आहेत.