494 views
वडगाव मावळ दि.15 (प्रतिनिधी) श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखाना अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक बुधवारी (दि.16 एप्रिल) कासारसाई येथील कारखाना सभागृहात होणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी मुकुंद पवार यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली.
या निवडणुकीसाठीचा कार्यक्रम ठरवण्यात आला असून, दुपारी 1 ते 1:30 या वेळेत नामनिर्देशन पत्र वाटप व स्वीकृती, 1:30 ते 2 या वेळेत छाननी, 2 वाजता वैध नामनिर्देशन पत्रांची यादी प्रसिद्ध, त्यानंतर 2 ते 2:30 या वेळेत नामनिर्देशन पत्र माघार घेता येणार आहे. दुपारी 2:30 वाजता अंतिम यादी जाहीर केली जाईल. त्यानंतर लगेचच 2:30 ते 3 या वेळेत मतदान आणि 3 ते 3: 30 वा.दरम्यान मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे. यानंतर तत्काळ अध्यक्ष व उपाध्यक्षांच्या नावांची घोषणा करण्यात येईल.
या निवडणुकीकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे. कारखान्याचे संस्थापक-अध्यक्ष नानासाहेब नवले यांच्या नेतृत्वाखालील सर्वपक्षीय शेतकरी विकास पॅनेलने यापूर्वी सर्व जागांवर आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. यावेळी नव्याने बहुतांश संचालक मंडळात सहभागी झाले असून, अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडते याबाबत विविध चर्चा रंगल्या आहेत.