*आमदार सुनील शेळके यांच्या 'जनता दरबार' उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद*

75 views

*२५० हून अधिक आठवड्यांपासून सुरू असलेला उपक्रम* *मावळात निर्माण केला लोकाभिमुखतेचा नवा आदर्श* वडगाव मावळ दि.22 (प्रतिनिधी) मावळ तालुक्याचे आमदार सुनील शेळके यांच्या जनता दरबार या उपक्रमाला गेल्या साडेपाच वर्षांपासून सातत्याने प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. दर सोमवारी वडगाव मावळ येथील शासकीय विश्रामगृहाच्या आवारात आयोजित होणाऱ्या या दरबारात मावळ तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून नागरिक आपल्या समस्या मांडण्यासाठी येतात.


Author : Admin
Publisher : admin
Update : 4 days ago
Date : Tue Apr 22 2025

image




सोमवार (दि.21) आयोजित करण्यात आलेल्या जनता दरबारात नागरिकांनी विविध प्रकारच्या समस्या आमदारांसमोर मांडल्या. यामध्ये प्रामुख्याने पायाभूत सुविधांशी संबंधित तक्रारींचा समावेश होता. खराब रस्ते, गटारांची अकार्यक्षमता, पाणीपुरवठ्यातील अडचणी तसेच बंद असलेल्या स्ट्रीटलाईट्सबाबत नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.


घरकुल योजनांत अपात्र ठरणे, परवानग्यांमध्ये होणारा विलंब, तसेच बेकायदेशीर बांधकामांबाबत कारवाईची मागणीही करण्यात आली. आरोग्य सेवा सुधारण्याची गरज, औषधांचा तुटवडा, तसेच आरोग्य शिबिरांच्या आयोजनाची मागणी याही नागरिकांनी यावेळी स्पष्टपणे मांडल्या.


शिक्षण क्षेत्रातील शिक्षकांच्या कमतरतेकडे लक्ष वेधले गेले, तर शिष्यवृत्तीसंबंधी तांत्रिक अडचणी आणि शाळा-महाविद्यालयांच्या सुविधांमध्ये सुधारणा व्हावी, अशी मागणी झाली. पोलिस प्रशासनाकडून होणारे दुर्लक्ष, गुन्हेगारी वाढ, घरफोडी व चोरीसारख्या घटनांविषयीही नागरिकांनी चिंता व्यक्त केली.



शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळत नसल्याच्या तक्रारी, पात्र असूनही नाव न येणे किंवा लाच मागितल्याच्या घटना याही निदर्शनास आणून देण्यात आल्या. वयोवृद्ध, अपंग व विधवा नागरिकांनी निवृत्तीवेतन, आधार कार्डातील त्रुटी, व बँक खात्यांशी संबंधित अडचणी मांडल्या.


रोजगाराच्या संधींचा अभाव, स्वयंरोजगारासाठी कर्ज मिळण्यात अडथळे, तसेच जमिनीच्या मालकीहक्क, हस्तांतरण व वादासंबंधी तक्रारी देखील मांडण्यात आल्या. सार्वजनिक वाहतुकीच्या सुविधा अपुऱ्या असल्याने प्रवाशांना होणाऱ्या त्रासाबाबतही नागरिकांनी आवाज उठवला.


या समस्या ऐकून आमदारांनी संबंधित विभागांना आवश्यक त्या सूचना देत लवकरात लवकर कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.


या दरबाराचे वैशिष्ट्य म्हणजे, तालुक्यातील सर्व शासकीय विभागांचे अधिकारी देखील यासाठी बोलावले जातात. त्यामुळे अनेक समस्या त्याच ठिकाणी आणि तत्काळ मार्गी लावल्या जातात. आतापर्यंत तब्बल २५० हून अधिक आठवडे सलगपणे चाललेल्या या उपक्रमामुळे लोकांना विश्वास वाटतो की, त्यांची अडचण कुणीतरी ऐकणारे आहे.

सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत आमदार शेळके स्वत: जनतेसमोर उपस्थित राहून नागरिकांच्या अडचणी शांतपणे ऐकून घेतात, त्यांचा सखोल विचार करतात आणि संबंधित अधिकाऱ्यांशी समन्वय साधून तोडगा काढण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतात. एखाद्या कामाला वेळ लागणार असल्यास तेही स्पष्टपणे सांगतात; तसेच काम शक्य नसेल तर तसेही स्पष्ट करतात.


कधी कधी काही अपरिहार्य कारणास्तव आमदार सुनील शेळके यांना सोमवारी उपस्थित राहणे शक्य होत नसते. अशा वेळी नागरिकांना याची पूर्वकल्पना दिली जाते. त्यामुळे फक्त काही मोजक्या सोमवार वगळता हा उपक्रम दर सोमवारी अखंडपणे सुरू आहे.


या उपक्रमात लहान मुले, महिलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वच वयोगटातील लोक सहभागी होतात. जनता दरबार हा एक प्रकारचा लोकशाहीचा प्रत्यक्ष अनुभव देणारा संवादमंच ठरला आहे.


या लोकोपयोगी आणि लोकाभिमुख उपक्रमामुळे आमदार सुनील शेळके यांची सर्वसामान्य जनतेशी असलेली नाळ अधिक दृढ झाली आहे. लोकांशी थेट संवाद, पारदर्शकता आणि कामाचा सातत्यपूर्ण प्रयत्न या तीन आधारस्तंभांवर उभा असलेला जनता दरबार हा मावळ तालुक्यात लोकप्रतिनिधित्वाचा आदर्श ठरतो आहे.




लेटेस्ट अपडेट्स