162 views
देहूगाव, दि. 18 (प्रतिनिधी) "मी एक लाख दहा हजार मतांनी निवडून आलो... आता त्याच प्रमाणात म्हणजे एक लाख दहा हजार झाडे लावणार!", असा ठाम आणि प्रेरणादायी संकल्प मावळचे आमदार सुनील शेळके यांनी केला. वृक्षारोपण आणि पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व अधोरेखित करत त्यांनी उपस्थित नागरिकांना 'झाडे लावा आणि झाडे जगवा', हा संदेश दिला.
*आमदार सुनील शेळकेंचा पर्यावरण रक्षणासाठी संकल्प*
क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त श्रीक्षेत्र देहू येथे वृक्षदाई प्रतिष्ठान, महात्मा फुले प्रतिष्ठान आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. श्रीक्षेत्र देहू येथील जगद्गुरू अभंग गाथावन येथे पार पडलेल्या या कार्यक्रमात आमदार सुनील शेळके यांनी त्यांच्या कार्यकाळात एक लाख दहा हजार झाडे लावणार असल्याची घोषणा केली. कार्यक्रमाला श्रीक्षेत्र देहू येथील श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष हभप जालिंदर महाराज मोरे, देहूगावच्या नगराध्यक्ष पूजा दिवटे, देहू नगरपंचायतीचे मुख्याधिकारी डॉ. प्रवीण निकम यांच्यासह विविध संस्था, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*काँक्रिटच्या जंगलातून हिरवाईकडे वाटचाल*
'आपण डोंगर फोडतो, काँक्रिटचे रस्ते, पूल उभे करतो. आजूबाजूला फक्त सिमेंटचं जंगल दिसतं. पण झाडं लावणं आणि त्यांचं संगोपन करणं ही आता काळाची गरज आहे,' असे सांगत आमदार शेळके यांनी उपस्थित नागरिकांना जागरूकतेचं आवाहन केलं. देहूतील 'गाथा वन' या आठ एकर वनक्षेत्राचा विशेष उल्लेख करत ते म्हणाले, "हे वनक्षेत्र चांगलं विकसित करा. नगरपालिकेने दोन कर्मचारी द्यावे, पाण्याची सोय करावी. मी जागेला कुंपण घालून देईन."
*वृक्षसंवर्धनातूनच भविष्य सुरक्षित*
"पाच-दहा वर्षांनंतर याच झाडांच्या छायेसाठी, ऑक्सिजनसाठी लोक इकडे धाव घेणार आहेत. झाडाखाली बसलं की शांतता, पक्ष्यांचा किलबिलाट, पॉझिटिव्ह ऊर्जा मिळते. हा आनंद पैशांनी विकत घेता येत नाही," असा भावनिक सूर आमदार शेळकेंनी व्यक्त केला.
*“मी झाड लावतो, तुम्ही झाड जगवा”*
"आपला आमदारकीचा पाच वर्षांचा कार्यकाळ आहे. मी झाडे लावीन, पण ती जगवण्याची जबाबदारी तुमची आहे", असे आमदार शेळके यांनी सांगितले. तुम्ही जितकी झाडे जगवाल तितकी माझ्या मतांत वाढ होईल," असा मिश्किल शेराही त्यांनी मारला.
"वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे" ही संकल्पना प्रत्यक्षात आणत आमदार शेळके यांनी पर्यावरण संवर्धनासाठी दिलेला शब्द आता कृतीतून पूर्ण करण्यासाठी नागरिक कसा प्रतिसाद देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.