125 views
वडगाव मावळ दि.1 (प्रतिनिधी) महापुरुषांचे विचार विद्यार्थ्यांच्याव्य क्तिमत्त्व विकासात मोलाचे ठरतात. राष्ट्रीय सेवा योजना शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ग्रामीण व शहरी जीवनातील समस्यांची जाण होते असे प्रतिपादन व्याख्याते विवेक गुरव यांनी केले.
श्री संत तुकाराम शिक्षण प्रसारक मंडळाच्या कला, वाणिज्य व बीबीए महाविद्यालय वडगाव मावळ राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष श्रमसंस्कार शिबिरात ते बोलत होते. हे शिबिर आंदर मावळातील नागाथली येथे दि . 23 ते 29 डिसेंबर 2024 या कालावधीत आयोजित करण्यात आले होते.
या शिबिरात शिवव्याख्याते संपत गारगोटे यांनी 'छत्रपती संभाजी महाराज' या विषयावर विचार मांडले. प्रा. सोमनाथ कसबे यांनी 'युवकांपुढील आव्हाने' या विषयावर विचार मांडले. शिबिराच्या समारोपप्रसंगी संस्थेचे संचालक राज खांडभोर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष तुकाराम आसवले, सचिव अशोक बाफना, उपाध्यक्ष बंडोबा मालपोटे, संचालक दत्ताभाऊ असवले, प्राचार्य अशोक गायकवाड व प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते. महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रम अधिकारी प्रा. रोहिणी चंदनशिवे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. डॉ. जया धावरे यांनी आभार मानले. विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. दरम्यान, शिबिरामध्ये विद्यार्थ्यांनी गावाचा परिसर, गावातील रस्ते स्वच्छ केले. विविध प्रबोधनात्मक आणि अंधश्रद्धा निर्मूलन या विषयांवर पथनाट्ये सादर केली.