506 views
तळेगाव दाभाडे दि.2 (प्रतिनिधी) तळेगाव-चाकण-शिक्रापूर राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरु झालेच असे समजून निश्चिंत रहा असे सुतोवाच केंद्रीय रस्ते विकास आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मावळचे आमदार सुनिल शेळके आणि महामार्ग कृती समितीच्या शिष्टमंडळाशी चर्चेदरम्यान रविवारी (दि.1) नागपूर येथे दिले.
अपघात,वाहतूक कोंडीसह गेली अनेक वर्षे रखडलेल्या तळेगाव-चाकण-शिक्रापूर राष्ट्रीय महामार्गाच्या कामासंदर्भात मावळचे आमदार सुनिल शेळके यांच्यासह तळेगाव- चाकण-शिक्रापूर महामार्ग कृती समितीचे उपाध्यक्ष दिलीप डोळस, सचिव अमीर प्रभावळकर, सदस्य संजय चव्हाण, गणेश बोरुडे आदींच्या शिष्टमंडळाने केंद्रीय रस्ते विकास आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपूर येथील निवासस्थानी रविवारी (दि.1) सकाळी भेट घेऊन निवेदन दिल्यानंतर चर्चा केली .
कृती समितीकडून दिलेल्या निवेदनात प्रस्तावित एनएच 548-डी तळेगाव-चाकण-शिक्रापूर सहा पदरी उन्नत महामार्गाच्या (एलिव्हेटेड कॉरिडॉर) भूसंपादनाची सनद प्रसिद्ध करुन निविदा प्रक्रिया पूर्ण करावी.सदर महामार्ग एमएसआईडीसीकडे (महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ) वर्ग करण्याच्या प्रक्रियेला गती द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे.तसेच प्रस्तावित उन्नत महामार्गाचे काम पुर्ण होण्यास लागणारा मोठा कालावधी पाहता,तोपर्यंत तात्पुरती उपयोजना आणि विशेष बाब म्हणून किमान अस्तित्वातील 54 किलोमीटर रस्त्याचे अतिक्रमण काढून तळेगाव-चाकण-शिक्रापूर रस्त्याचे दुभाजकावर चौपदरीकरण करण्यात यावे असे निवेदन कृती समितीकडून गडकरी यांना देण्यात आले.त्यावर गडकरी यांनी सकारात्मकता दाखवत "तुमच्या रस्त्याचे काम झाले म्हणून समजा" असे गडकरी यांनी शिष्टमंडळाला सांगत सदर रस्त्याच्या कामाला प्राधान्याने गती देणार असल्याचे सांगितले.
याबरोबरच जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर वाहतूककोंडी होत असलेल्या मुख्य ठिकाणी उड्डाणपूल उभारावेत तसेच सेवारस्त्यांच्या प्रलंबित कामांबाबत आम्ही सातत्याने मागणी करीत आहोत याची दखल घेत लवकरच ठोस निर्णय घेणार असल्याचे केंद्रीय मंत्री गडकरी यांनी आमदार शेळके यांना सांगितले.
तळेगाव-चाकण महामार्गासंदर्भात केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी ठोस आश्वासन दिल्याने अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रश्नांना नक्कीच गती मिळणार आहे.