233 views
लोणावळा दि.2 (प्रतिनिधी) कार्ला येथील वेहरगाव एकवीरा गडावर नववर्षारंभाच्या निमित्ताने भाविकांची मोठी गर्दी उसळली होती. मात्र, काही अतिउत्साही भाविकांनी मनाई असतानाही मंदिराजवळ रंगीत धुराचे फटाके फोडले. फटाक्यांमुळे मधमाशांच्या पोळ्यांना इजा पोहोचल्याने मधमाशांनी संतप्त होऊन भाविकांवर हल्ला केला.
या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे गडावर एकच गोंधळ उडाला, आणि अनेक भाविकांना मधमाश्यांनी चावा घेतल्याने ते जखमी झाले. यात चेंगराचेंगरी झाल्याने 20 ते 25 भाविक जखमी झाले त्यांच्यावर एकविरा हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत आहेत. लहान मुलांचाही समावेश आहे.
मुंबईच्या कुलाबा येथून देवीची पालखी घेऊन आलेल्या भाविकांपैकी काहींनी हे फटाके वाजवले, ज्यामुळे इतर भाविकांनाही त्रास सहन करावा लागला. या आधीपासूनच एकविरा गडावर फटाके वाजविण्यास बंदी आहे, परंतु तरीही काही भाविक या नियमांकडे दुर्लक्ष करतात.
या घटनेनंतर ग्रामस्थांनी गडावरील फटाक्यांवरची बंदी अधिक कडक करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. कार्ला येथील ग्रामस्थ अशोक कुटे यांनी याबाबत प्रशासनाने कठोर पावले उचलावीत, असे आवाहन केले आहे.
भाविकांसाठी सूचना
भाविकांनी गडावर नियमांचे पालन करावे आणि प्राचीन ठिकाणाच्या संवर्धनासाठी सहकार्य करावे, असे आवाहन स्थानिक प्रशासनाने केले आहे.