314 views
चाकण दि.3 (प्रतिनिधी) बहुळ गावातील दरोडा प्रकरणातील दरोडेखोरांना पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवरच आरोपींनी जीवघेणा हल्ला चढवला. या हल्ल्यात पोलीस उपायुक्त शिवाजी पवार आणि फौजदार प्रसन्न जऱ्हाड जखमी झाले असून, त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत मध्यरात्री थरारक घटना घडली.
पोलिस उपायुक्त शिवाजी पवार यांच्यासह उपनिरीक्षक प्रसन्न जऱ्हाड जखमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बहुळ येथे काही दिवसांपूर्वी वृद्ध दाम्पत्याच्या घरात घुसून सहा दरोडेखोरांनी चाकू आणि सुरीचा धाक दाखवत लूटमार केली होती. त्यांनी घरातील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम लुटून धूम ठोकली होती. या घटनेमुळे परिसरात दहशत निर्माण झाली होती.
या प्रकरणाच्या तपासादरम्यान पोलिसांना गुप्त सूत्रांकडून माहिती मिळाली की, दरोडेखोर चिंचोशी गावात आणखी एक दरोडा टाकण्याच्या तयारीत आहेत. त्यानुसार, पोलीस उपायुक्त शिवाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी सापळा रचला.
बहुळ येथील दरोडा प्रकरणातील प्रमुख आरोपी सचिन चंदर भोसले आणि मिथुन चंदर भोसले हे पोलिसांच्या रडारवर होते. ते पुन्हा दरोड्याच्या तयारीत असल्याची माहिती चाकण पोलिसांना मिळाली होती. सचिन भोसले हा अत्यंत सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर यापूर्वी ९ गंभीर गुन्हे दाखल आहेत.
दरोडेखोरांना पकडण्याचा प्रयत्न करताच त्यांनी पोलिसांवर थेट कोयत्याने हल्ला चढवला. अचानक झालेल्या हल्ल्यात उपायुक्त शिवाजी पवार आणि फौजदार प्रसन्न जऱ्हाड जखमी झाले आहेत.
दरम्यान, स्वतःचा बचाव करण्यासाठी उपायुक्त पवार यांनी प्रत्युत्तरादाखल एक गोळी झाडली. यामध्ये एका आरोपीच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून, त्याला घटनास्थळीच अटक करण्यात आले आहे. इतर एक आरोपी अंधाराचा फायदा घेत पळून जात असताना त्याला पाठलाग करून अटक करण्यात आली.