441 views
वडगाव मावळ दि.9 (प्रतिनिधी) संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या 21 जागांसाठी 226 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांमध्ये प्रामुख्याने कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष विदुरा ऊर्फ नानासाहेब नवले, उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे यांच्यासह बहुतांश विद्यमान संचालक तसेच मावळचे आमदार सुनील शेळके यांचे भाऊ , ज्येष्ठ नेते माऊली दाभाडे यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांचा समावेश असल्याने निवडणुकीबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात असून चर्चेला मोठे उधाण आले आहे.
पाच गटांमध्ये सर्वांधिक 47 अर्ज हे सोमाटणे-पवनानगर या गटातील तीन जागांसाठी दाखल झाले असून इतर मागासवर्ग एका जागेसाठी तब्बल 37अर्ज आले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी मुकुंद पवार यांनी दिली.
5 एप्रिल रोजी होणाऱ्या कारखाना संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शुक्रवारी (दि.7) शेवटचा दिवस होता. संचालक मंडळाच्या एकूण 21 जागांसाठी एकूण 226 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहे
यामध्ये ऊस उत्पादक गट क्रमांक 1 हिंजवडी-ताथवडे या गटातील 3 जागांसाठी 23 अर्ज, ऊस उत्पादक गट क्रमांक 2 पौड-पिरंगुट या गटातील 3 जागांसाठी 18 अर्ज, ऊस उत्पादक गट क्रमांक 3 तळेगाव-वडगाव या गटातील 3 जागांसाठी 29 अर्ज, ऊस उत्पादक गट क्रमांक 4 सोमाटणे पवनानगर या गटातील तीन जागांसाठी 41 अर्ज, ऊस उत्पादक गट क्रमांक 5 खेड-शिरूर-हवेली या गटातील चार जागांसाठी 37 अर्ज, महिला राखीव दोन जागांसाठी 23 अर्ज, अनुसूचित जाती/जमाती एका जागेसाठी 9 अर्ज, इतर मागासवर्ग एका जागेसाठी 37 अर्ज व विमुक्त जाती/भटक्या जमाती/विमाग्र एका जागेसाठी 9 अर्ज असे एकूण 226 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.
दाखल झालेल्या उमेदवारी अर्जाची छाननी सोमवारी (दि.10) तारखेला होणार असून, अर्ज मागे घेण्यासाठी 25 मार्चपर्यंत मुदत आहे. दि 5 एप्रिल रोजी आवश्यकतेनुसार मतदानप्रक्रिया घेण्यात येणार आहे.
दरम्यान, 226 उमेदवारीअर्ज दाखल झाले असले तरी काही उमेदवारांनी दोन-दोन अर्ज भरले असल्याने प्रत्यक्षात उमेदवारांची संख्या सुमारे 200 च्या आसपास आहे. 25 मार्च रोजी अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशीच निवडणुकीचे खरे चित्र समोर येणार आहे.